स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय ? स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, वैशिष्ट्ये, व्याप्ती, महत्व, मर्यादा – MACRO ECONOMICS In Marathi 

मित्रांसह शेअर करा - Share this
4.3/5 - (6 votes)

स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय ? स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, वैशिष्ट्ये, व्याप्ती, महत्व, मर्यादा , स्थूल अर्थशास्त्र ची व्याख्या  – MACRO ECONOMICS In Marathi  ,स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची शाखा आहे जी एकूण चलांचे वर्तन आणि कार्यप्रदर्शन आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणार्‍या समस्यांवर लक्ष केंद्रित करते. यात प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थांचा समावेश आहे

आणि बेरोजगारी, गरिबी, सामान्य किंमत पातळी, जीडीपी (स्थूल देशांतर्गत उत्पादन), आयात आणि निर्यात, आर्थिक वाढ, जागतिकीकरण, आर्थिक/वित्तीय धोरण इत्यादीसारख्या अर्थव्यवस्थेच्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे. यामुळे अर्थव्यवस्थेच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात मदत होते, ज्यामुळे ते कार्यक्षमतेने कार्य करण्यास सक्षम होते.

 

MACRO ECONOMICS In Marathi

Table of Contents

स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय ? – स्थूल अर्थशास्त्र ची व्याख्या 

प्रो. बोल्डींग स्थूल अर्थशास्त्र हे वैयक्तिक खरेदी परिमाणा ऐवजी एकूण खरेदी परिमाणाची बेरीज, वैयक्तिक उत्पन्ना ऐवजी राष्ट्रीय उत्पन्नाचा वैयक्तिक किंमती ऐवजी सामान्य मूल्य स्तराचा वैयक्तिक उत्पनाऐवजी राष्ट्रीय उत्पादनाचा अभ्यास करते.

प्रा. जे. एल. हॅनसन “समग्रलक्षी अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की, जी रोजगाराचे परिणाम एकूण बचत आणि गुंतवणूक, राष्ट्राय उत्पन्न अशा मोठ्या समुच्चयातील संबंधाचा विचार करते.

प्रा. अक्ले “समग्रलक्षी अर्थशास्त्र हे आर्थिक परिमाणांचा समग्र पातळीवर विचार करते तसेच ते आर्थिक जीवनाच्या समग्र पैलूंशी संबंधीत असते.” एकूणच समग्रलक्षी अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रितरित्या अभ्यास करते.

 

स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ –   MACRO ECONOMICS MEANING In Marathi 

Macro ह्या शब्दाची उत्पत्ती Makros या ग्रीक शब्दापासून झालेली आहे. Macro म्हणजे मोठा किंवा व्यापक होय. या अर्थशास्त्रात सूक्ष्म अर्थशास्त्रा प्रमाणे एक एककाचा बारकाईने अभ्यास न करता संपूर्ण / एकूण सर्वच एककांचा एकत्रित अभ्यास केला जातो..

अर्थशास्त्रात समग्रलक्षी या संज्ञेचा वापर प्रथम १९३३ मध्ये प्रा. रैग्नर फ्रिश यांनी केला १९ व्या शतकात त्याचा विकास माल्थस, सिस्मोन्दी, कार्लमार्क्स इ. अर्थशास्त्रज्ञांनी केला तर आधुनिक काळात केन्सच्या पूर्वी वालरस विक्रसेल, फिशर, कैंसल, रॉबर्टसन, हायके, हाँट्रे इ. नी केला. परंतु खऱ्या अर्थाने समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या विकासाचे श्रेय लॉर्ड केन्स यांना दिले जाते.

 १९३६ मध्ये केन्स यांनी The General theory of Employment Interest and Money हा ग्रंथ प्रकाशित केला व समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या विकासाला प्रोत्साहन दिले.

समग्रलक्षी अर्थशास्त्रात संपूर्ण आर्थिक व्यवस्थेचा एकत्रित अभ्यास केला जातो. एकूण रोजगार, एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न, एकूण खर्च, एकूण उपभोग, राहणीमान, देशाचे मौद्रीक धोरण, राजकोषीय धोरण, एकूण आंतरराष्ट्रीय व्यापार हा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे.

समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट होण्यासाठी त्याच्या काही व्याख्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे..

 

स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये –  MACRO ECONOMICS FEATURES in Marathi 

 

1.सर्व एककांचा अभ्यास

समग्रलक्षी अर्थशास्त्रात एका एककाचा वैयक्तित पातळीवर अभ्यास न करता सर्वच एककाच्या आर्थिक व्यवहारांचा एकत्रितरित्या अभ्यास करते. यात वैयक्तिक उत्पन्ना ऐवजी राष्ट्रीय उत्पन्नाचा वैयक्तिक किंमती ऐवजी संपूर्ण किंमत पातळीचा. एका उद्योगा ऐवजी संपूर्ण औद्योगिक संरचनेचा अभ्यास केला जातो.

2.सामान्य संतुलन पद्धती

समग्रलक्षी अर्थशास्त्र आर्थिक विश्लेषणाकरीता सामान्य संतुलन पद्धतीचा उपयोग करते.

3.व्यापक अर्थशास्त्र:

समग्रलक्षी अर्थशास्त्र हे व्यापक स्वरुपाचे अर्थशास्त्र आहे. कारण ह्यात अनेक एककांचा • एकत्रितरित्या अभ्यास केला जातो. अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासास एकाचवेळी प्राधान्य दिले जाते.

 

4.आंतरराष्ट्रीय संकल्पनांना महत्त्वः

समग्रलक्षी अर्थशास्त्रात आंतरराष्ट्रीय व्यापार, परकीय मदत व्यवहारतोल या सारख्या संकल्पना महत्त्वपूर्ण ठरतात.

5.उत्पन्न विश्लेषण

समग्रलक्षी अर्थशास्त्र हे उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत किंवा उत्पन्न विश्लेषण म्हणून देखील ओळखले जाते.

6.रोजगार निर्धारकांचा अभ्यास

समग्रलक्षी अर्थशास्त्र हे बेकारीची कारणे आणि रोजगाराचे विविध निर्धारक यांचा अभ्यास करते.

7.विविध सिद्धांताचा अभ्यासः

समग्रलक्षी अर्थशास्त्रात उत्पन्न व रोजगार सिद्धांत सामान्य मुल्य स्तर व चलवाढीचे सिद्धांत तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचा अभ्यास केला जातो.

 

स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती – (SCOPE OF MACROECONOMICS in marahi)

व्याप्तीच्या दृष्टीने सुद्धा सुक्ष्म अर्थशास्त्र व समग्र अर्थशास्त्र यात मुलभूत फरक आहे.

सुक्ष्म अर्थशास्त्रात एका घटकाचा एका व्यक्तीच्या उत्पन्न, उपभोग, राहणीमान, बचत, गुंतवणूक पातळीचा तसेच एका वस्तूचे उत्पादन किंमत इ. विचार व अभ्यास केला जातो तर समग्र लक्षी अर्थशास्त्रात देशाचे एकूण उत्पादन, उत्पन्न, बचत गुंतवणूक किंमत एकूण राजकोषीय धोरण, मौद्रीक धोरण, अंतरराष्ट्रीय व्यापार इ. चा व्यापक स्वरुपात अभ्यास केला जातो. अशा समग्र अर्थशास्त्राची व्याप्ती पुढील तक्त्याद्वारे अधिक स्पष्ट करता येईल.

 

1. उत्पन्न व रोजगार सिद्धांत:

समग्रलक्षी अर्थशास्त्रात देशातील उत्पन्न पातळी व रोजगार पातळीचा अभ्यास करतांनी ती कशावर अवलंबून असते व तीच्या मध्ये कशामूळे बदल होतात याचा विचार केला जातो. या शिवाय उपभोग, गुंतवणूक फलन यांचा ही अभ्यास केला जातो. तसेच या अंतर्गत येणारे व्यापारचक्राचे सिद्धांत ही उत्पन्न व रोजगार विषयक सिद्धांताचा भाग ठरतात.

 

2.सामान्य मुल्य स्तराचा सिद्धांतः

ज्यात मुद्रामुल्याचे सिद्धांत तसेच चलनवाढ, चलनघट, इ. चा ही अभ्यास केला जातो.

 

4.आर्थिक विकासाचे सिद्धांत:

साधारणतः दुसऱ्या महायुद्धानंतर विकासाचे अर्थशास्त्र ही एक नवीन शाखा विकसीत झाली. ह्या अंतर्गत विकसनशील देश व विकसीत देशा संदर्भात लागू पडणाऱ्या आर्थिक विकास व अधिक वृद्धीच्या अनेक प्रश्नांचा अभ्यास यात केला जातो.

 

5.समष्टी वितरण सिद्धांतः

राष्ट्रीय उत्पन्नाचे उत्पादनाच्या चारही घटकात म्हणजे भूमी, श्रम, भांडवल व संयोजन यामध्ये खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरुपात कशा प्रकारे विभाजन केले जाते म्हणजे उत्पादन घटकांना मिळणारे मोबदले ठरविण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्र उपयोगी पडते.

6. आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत:

आंतरराष्ट्रीव्यापार सिद्धांतांची चर्चासुद्धा समग्रलक्षी अर्थव्यवस्थेत होत असताना दिसून येते. या शिवाय व्यवहारतोल व विनिमयदर देशात आर्थिक वृद्धी कोणत्या घटकांमुळे घडून येऊ शकते. या संदर्भात सुद्धा योग्य विश्लेषण समग्रलक्षी अर्थशास्त्रात केले जाते.

7 व्यवहारतोल आणि विनिमय दरः

एका विशिष्ट कालखंडात एका देशाने इतर देशांबरोबर केलेल्या दृश्य वस्तू व अदृश्य सेवांच्या आयात निर्यातीचा व्यवहार यांचा समावेश यात होतो. व्यवहारतोल तुटीचा आहे की वाढाव्याचा त्यावरुन त्यांच्या व्यवहाराची दिशा ठरत असते. अर्थात व्यवहारतोलावर विनिमय दराचा प्रभाव पडतो. विनिमय दर म्हणजे दोन देशातील चलनांची ज्या दराने देवाण घेवाण होते. तो दर होय. या सर्व बाबींचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रात होतो.

8.आर्थिक वृद्धीः

आर्थिक वृद्धी आणि वृद्धी विषयक सिद्धांत हा सुद्धा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. अर्थात विकसनशील देशांबाबतीत हे सिद्धांत आर्थिक विकासाचे सिद्धांत म्हणून ओळखले जातात. अशा प्रकारे समग्रलक्षी अर्थशास्त्र समग्र पातळीवर अनेक बाबीचा अभ्यास करते. परिणामी ह्या अर्थशास्त्राची व्यापकता खूप अधिक आहे.

 

स्थूल अर्थशास्त्राचे महत्व –   Macro Economics Significance in marathi 

 

1.सरकारला उपयुक्तः 

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाला अनेक प्रकारची धोरणे राबवावी लागतात. सरकारला आर्थिक धोरण निश्चित करतांना एका विशिष्ट एककाचा विचार न करता एकूण समूहाचा विचार करावा लागतो. समग्रलक्षी अर्थशास्त्रात सर्व एककांचा सामुहीक विचार व अभ्यास केला जात असल्यामुळे आर्थिक धोरण ठरवितांना सरकारला त्याचा उपयोग होतो.

2.संचालन समजून घेणे

सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक पातळीवर एक एक घटकांचा अभ्यास केला जात असल्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे स्वरुप समजू शकत नाही. परंतु समग्रलक्षी अर्थशास्त्रात सर्वच एककांचा एकत्रित अभ्यास केला जात असल्याने अर्थव्यवस्थेचे संचालन संपूर्णपणे समजून घेण्यासाठी मदत होते.

3.सूक्ष्म अर्थशास्त्रास उपयुक्त

सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यासले जाणारे नियम हे समग्रलक्षी अर्थशास्त्रावर आधारित आहेत. उदा. सूक्ष्म अर्थशास्त्रातील मागणीचा नियम मांडताना प्रामुख्याने समाजातील अनेक व्यक्तींच्या मागणीचा अभ्यास करावा लागतो आणि आढळणाऱ्या या सर्वसामान्य प्रवृत्तीवरुन मागणीचा नियम तयार केला गेला. अर्थात नियमाची पडताळणीसुद्धा समुहाच्या अनुभवावरच आधारित असते. अशा प्रकारे समग्रलक्षी अर्थशास्त्र सूक्ष्म अर्थशास्त्रास मदत करते.

4.विश्लेषण अधिक उपयुक्तः

 सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासातर्गत काही संकल्पनांचे स्पष्टीकरण हे अवास्ताविक गृहीतावर आधारित दिसून येते. उदा. पूर्ण रोजगार, पूर्ण स्पर्धा इ. परंतु समग्रलक्षी अर्थशास्त्रात संपूर्ण आर्थिक घटकांचा एकत्र अभ्यास केला जात असल्याने त्यांचा पाया अवास्तव गृहीतावर नसल्याने ते विश्लेषण अधिक उपयुक्त ठरते.

5.राष्ट्रीय प्रश्न सोडविण्यासाठी

समग्रलक्षी अर्थशास्त्र देशातील सर्वच बाबींचा एकत्रितपणे अभ्यास करीत असल्यामुळे देशाला भेडसावणारे विविध प्रश्न समस्या उदा. व्यापार चक्र, बेरोजगारी, घटते. राष्ट्रीय उत्पन्न इ. प्रश्न सोडविण्यासाठी विविध उपायात्मक मार्ग सुचविण्याचे कार्य समग्रलक्षी अर्थशास्त्र करते.

6.अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मूल्यमापन

समग्रलक्षी अर्थशास्त्रामुळे देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, त्याचे अर्थव्यवस्थेतील विविध उत्पन्न गटातील लोकांमध्ये कशा पद्धतीने विभाजन झालेले आहे हे समजून घेता येत असल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहाय्याने अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मूल्यमापन शक्य होते.

7.विरोधाभासाचे स्पष्टीकरण

सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक पातळीवर काढलेले निष्कर्ष हे पूर्णपणे समग्रलक्षी अर्थशास्त्रात जसेच्या तसे लागू पडत नाहीत. उलट यातून विरोधाभास स्पष्ट करण्याचे काम समग्रलक्षी अर्थशास्त्र करते. उदा. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रानुसार एका उद्योगसंस्थेच्या बाबतीत रोजगार वाढ करतांना वेतन कपात करुन जास्तीत जास्त लोकांना रोजगार पुरविणे शक्य असते. परंतु समग्रलक्षी पातळीवर पूर्ण देशातील उद्योगधंद्यातील वेतन कपात केल्याने रोजगार वाढण्याऐवजी घटण्याची शक्यता अधिक असते. अशा प्रकारचा विरोधाभास अधिक चांगल्याप्रकारे स्पष्ट करण्याचे कार्य समग्रलक्षी अर्थशास्त्र करते.

 

8.आर्थिक विकास

समग्रलक्षी अर्थशास्त्रात देशातील एकूण साधनसामग्रीची उपलब्धता, त्यांची कार्यक्षमता, देशातील एकूण उत्पन्न, उत्पादन, रोजगार यात वाढ करण्याच्या दृष्टीने योजनांची आखणी व अमंलबजावणी विकासात्मक धोरणांच्या प्रकल्पांची आखणी अंमलबजावणी इ. गोष्टी आर्थिक विकासाची पातळी वाढवितात.

एकूणच समग्रलक्षी अर्थशास्त्रामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण बाबीचे ज्ञान होऊन अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आर्थिक धोरणांची आखणी व अंमलबाजावणी करणे तसेच विविध समस्यांवर उपाय सुचविणे व त्या सोडविणे शक्य होते.

 

स्थूल अर्थशास्त्राच्या मर्यादा –  (Limitations of macro economics in marathi 

1.अतिसामान्यीकरण

वैयक्तिक पातळीवरील अनुभवांचे अतिसामान्यीकरण केल्यास निघणारे निष्कर्ष है विरोधाभासात्मक ठरतात. कारण एका व्यक्तीबाबत एखादी बाब योग्य असली तरी ती संपूर्ण समुहाला तशीच फायदेशीर ठरेल असे नाही. उदा. एका उद्योगसंस्थेतील मजुरीचा दर कमी करुन रोजगार वाढविता येईल. परंतु सर्वच उद्योगसंस्थातील म्हणजेच उद्योगधंद्यातील श्रमिकांची मजूरी कमी केल्यास त्याचा उलट परिणाम होऊन उत्पन्न कमी होऊन त्यांची मागणी कमी. परिणामी उत्पादन कमी व बेरोजगारी वाढेल.

2.समुहाच्या रचनेकडे दुर्लक्षः

समुहातील प्रत्येक एकक हा दुसऱ्याहून भिन्न असतो. अशा वेळी समग्रलक्षी अर्थशास्त्राचे निर्णय वैयक्तिक एककाच्या संदर्भात चूकीचे ठरतात. उदा. वैयक्तिक पातळीवर बचत करणे हा गुण ठरतो. परंतु सामुहीक पातळीवर मोठ्या प्रमाणात बचत केली गेली तर बाजारातील एकूण मागणी कमी होऊन मंदीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

3.सारख्याच प्रभावाचा अभावः

तेजीच्या काळात वाढत्या किंमतीमुळे उपभोक्त्याला जरी तोटा होत असला तरी उत्पादक व व्यापारी यांना फायदा होतो. म्हणजेच सामुहिक प्रवृत्तीचा सर्वत्र सारखाच प्रभाव पड़त नाही.

4.विवेचनात अडचणी

एकातील बदलानुसार संपूर्ण प्रवृत्तीचे मोजमाप करणे अडचणीचे असते. परिणामी समग्रलक्षी पद्धतीचे विवेचन करणे अडचणीचे जाते..

 

5.चुकीचे निष्कर्ष

काही वेळा सामुहीक अभ्यासातून काढलेले निष्कर्ष हे नवीन धोरण योजनांची आवश्यकता नाही असे दर्शवितात. परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांची आवश्यकता असते. उदा. शेतमालाच्या किंमती १० टक्के कमी झाल्या तर उद्योगातील मालाच्या किंमती १० टक्के वाढल्या तर सामान्य मूल्यस्तरावर परिणाम न झाल्यामुळे समग्रलक्षी विश्लेषणानुसार नवीन धोरणाची आवश्यकता भासणार नाही. परंतु प्रत्यक्षात मात्र अशा परीस्थितीत शेतकऱ्याच्या मदतीसाठी शासनाला नवीन धोरण व योजना स्विकारणे आवश्यक ठरते.

6 .सांख्यीकीय अडचणी 

समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हा मोठ्या प्रमाणात सांख्यिकीय माहितीवर आधारीत असतो. विशेषतः विकसनशील देशांमध्ये अशा प्रकारची माहिती अचूक व वेळेवर मिळणे खूप अडचणीचे जाते. परिणामी समग्रलक्षी अर्थशाखाच्या योग्य व कार्यक्षम वापरावर मर्यादा पडतात.

 

 

 

 

स्थूल अर्थशास्त्रचे जनक कोण आहेत?

अडम स्मिथ हा अर्थशास्त्राचा जनक असेल तर जॉन मेनार्ड केन्स हा मॅक्रोइकॉनॉमिक्सचा जनक आहे.

अर्थशास्त्राच्या जनकाचे नाव काय आहे?

अडम स्मिथला आधुनिक अर्थशास्त्राचे संस्थापक जनक मानले जाते (ते तेव्हा राजकीय अर्थव्यवस्था म्हणून ओळखले जात होते). ते स्कॉट्समन होते आणि ग्लासगो विद्यापीठात प्राध्यापक होते.

मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय?

मॅक्रोइकॉनॉमिक्स अर्थव्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करते – आर्थिक उत्पादन, चलनवाढ, व्याज आणि परकीय चलन दर आणि पेमेंट बॅलन्समधील बदल.

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.

Leave a Comment