विमा म्हणजे काय ? विम्याचे प्रकार आणि विम्याची वैशिष्ट्ये , विमा का महत्त्वाचा आहे, संपूर्ण माहिती |Insurance information in Marathi 

मित्रांसह शेअर करा - Share this
5/5 - (2 votes)

विमा म्हणजे काय ?जीवन विमा म्हणजे काय,  विम्याचे प्रकार आणि विम्याची वैशिष्ट्ये , विमा का महत्त्वाचा आहे, संपूर्ण माहिती |Insurance information in Marathi  – नमस्कार मित्रमंडळी!!! आपण या लेखात विमा याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत.

यात आपण विमा म्हणजे नेमके काय असते त्याचे प्रकार कोणकोणते आहेत आणि विमा कंपनी कायद्यानुसार आवश्यक असणारी पुस्तके याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तरी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला विमा याबद्दल संपूर्ण माहिती प्राप्त होण्यास मदत होईल. 

विमा म्हणजे काय  -  Insurance information in Marathi 

विमा म्हणजे काय ? –  Insurance information in Marathi 

“भविष्यकाळातील संभाव्य धोक्यांपासून संरक्षण मिळविण्यासाठी केलेल्या आर्थिक योजनेची तरतूद म्हणजे विमा होय”.

    मानवी जीवनातील विविध धोक्यांपासून उद्भवणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी केलेली योजना म्हणजेच विमा होय. मानवी प्रयत्न नष्ट होणार नाहीत, तसेच माणसाच्या विविध योजना उध्वस्त होणार नाहीत, याची खबरदारी विम्याद्वारे घेतली जाते. विमा हा एक मान्यताप्राप्त व्यवसाय बनलेला आहे. 

 

या विमा व्यवसायात अनेक विमा कंपन्या उदयास आलेल्या आहेत. विविध प्रकारच्या धोक्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी विमा उतरविण्याची सोय आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या नुकसानीची, आपत्तीची किंवा धोक्यांची शक्यता विचारात घेऊन विमा काढला जातो. विमा काढणाऱ्या व्यक्तीला संबंधित धोक्यांपासून जे नुकसान होते, त्याबद्दल विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळते. 

उदाहरणार्थ, एखाद्या व्यापाऱ्याने आपल्या  दुकानाचे आगीमुळे नुकसान होऊ नये म्हणून विमा उतरविला असेल आणि दुकानाला आग लागून जर भविष्यकाळात या व्यापाराचे नुकसान झाले तर त्याला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळते.कोणत्याही प्रकारच्या धोक्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी विमा उतरविता येतो व विमा प्रमंडळाकडून नुकसान भरपाई मिळते.अर्थात, ह्यासाठी काही अटींचे पालन करावे लागते किंवा पूर्तता करावी लागते. 

     विमा प्रमंडळामार्फत विविध विमा योजनांची अंमलबजावणी केली जाते. भारतात स्वातंत्र्यपूर्व काळापासून विमा व्यवसाय चालू आहे. प्रामुख्याने भविष्यातील धोके सहन करण्याची ताकद निर्माण व्हावी व संभाव्य धोक्यापासून संरक्षण मिळावे ही विमा योजनेची मुख्य भूमिका आहे.आज विमा व्यवसायात अनेक विमा प्रमंडळे उतरलेली आहेत.

 

विम्याची वैशिष्ट्ये – Insurance features in Marathi 

     विमा हा दोन पक्षांमधील करार आहे. यातील एक पक्ष म्हणजे विमा उतरविणारा ज्याला विमेधारक (Insured)असे म्हणतात व दुसरा पक्ष म्हणजे विमा प्रमंडळ (Insurer).विमा करार म्हणजे विमेधारक विमा प्रमंडळाला विशिष्ट मुदतीने विशिष्ट रक्कम देतो ज्याला “विमा हप्ता” असे म्हणतात.ह्या बदल्यात विशिष्ट घटना घडल्यास विमा प्रमंडळ विमेधारकाला विवक्षित रक्कम नुकसान भरपाई म्हणून देते.

 जर अशी विशिष्ट घटना घडली नाही तर विमेधारकाने विमा हप्त्याच्या द्वारे भरलेली रक्कम विमा प्रमंडळाच्या मालकीची होते. अर्थात ह्यास आयुर्विमा अपवाद आहे. हा नियम सामान्य विम्याचे लागू आहे.  ह्या करारालाच विमा पत्र असे म्हणतात. हा करार विशिष्ट मुदतीचा असतो. विमेधारकाने ज्या कारणासाठी विमा उतरविला आहे त्या कारणामुळे जर कराराच्या मुदतीत विमेधारकाचे नुकसान झाले तर विमा प्रमंडळ विमेधारकात विमा रकमे एवढी नुकसान भरपाई देते.  उदाहरणार्थ, अग्नि विमा उतरविला असल्यास आगीमुळे झालेले नुकसान विमा प्रमंडळ विमेधारकास देते. 

 

    विमा योजनेमुळे व्यक्ती तसेच व्यापारी संस्था यांच्या मनातील भीती,  शंकाकुशंका, संकटांची काळजी ह्यातून मुक्तता होते व व्यक्ती आपल्या कार्यावर तसेच व्यापारी आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करू शकतात.अशाप्रकारे व्यापार व उद्योग- धंद्याच्या वाढीमुळे विमा प्रमंडळ महत्त्वाची व सहाय्यकाची भूमिका बजावत आहे.विमा योजनेमुळे व्यापार- धंद्याचा विकास झाला. दैनंदिन जीवनात विमा प्रमंडळाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. विविध कारणांसाठी विमा उतरविण्याची सोय असल्याने विमा प्रमंडळाची सेवा मोलाची ठरली आहे. भारतात विमा व्यवसायाचा विकास झालेला असून त्यासाठी स्वतंत्र कायदा ही मंजूर करण्यात आलेला आहे. विम्याचे विविध प्रकार आहेत. 

 

विमा चे प्रकार  – Insurance type in Marathi 

 

विम्याचे प्रामुख्याने पुढील दोन प्रकार आहेत :- 

 

1]आयुर्विमा 

2]सामान्य विमा 

 

1]आयुर्विमा – Life Insurance information in Marathi 

आयुर्विमा व्यवसायात सुरक्षितता असावी म्हणून ऑक्टोंबर 1955 मध्ये एक वटहुकूम काढून ह्या व्यवसायाचे सरकारने राष्ट्रीयकरण केले. त्यासाठी 1सप्टेंबर 1956 रोजी स्वतंत्र आयुर्विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली. 1956 रोजी आयुर्विमा व्यवसायासाठी स्वतंत्र कायदा मंजूर करण्यात आला.

 या कायद्यानुसार आयुर्विम्याचा व्यवसाय करण्याची परवानगी राष्ट्रीयकृत “आयुर्विमा महामंडळालाच” देण्यात आली. नोव्हेंबर 2000 मध्ये खाजगीक्षेत्रास विमा क्षेत्रात प्रवेश करण्यास अनुमती देण्यात आली व त्यानंतर एचडीएफसी, आयसीआयसीआय यासारख्या अनेक खाजगी क्षेत्रातील कंपन्यातसेच प्रोडेशियल, झुरीच, इत्यादीत यासारख्या विदेशी कंपन्या देखील आयुर्विमा महामंडळाची स्पर्धा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

असे असले तरी 31 मार्च 2002 रोजी आयुर्विमा महामंडळाची आर्थिक परिस्थिती पुढीलप्रमाणे होती-

 

  1. जीवन निधी (1,54,000 कोटी)

   2.महामंडळाच्या एकूण मालमत्तेचे मूल्य रुपये 1,60,935.73 कोटी रुपये.

  1. एकूण उत्पन्न रुपये 45,174.15 कोटी रुपये.

 

       आयुर्विमा महामंडळाच्या विविध विमा योजना आहेत.त्यापैकी बहुतांशी योजना ह्या गुंतवणुकीच्या दृष्टीने आकर्षक  व्हावे, या आधारावर तयार केलेल्या आहेत. यामध्ये विमेधारकाच्या दृष्टीने आयुष्यातील मृत्यूचा धोका हे जरी आकर्षण असले तरी गुंतवणूक व त्यावरील उत्पन्न हे सुद्धा महत्त्वाचे आकर्षण आहे. आयुर्विमा महामंडळाच्या पुढील विविध योजना आहेत :- 

 

1) आजीवन विमा – whole life insurance In Marathi 

ह्या योजनेअंतर्गत विमाधारकाला आपल्या हयात भर करारात ठरलेली विमा हप्ता रक्कम ठरलेल्या मुदतीच्या अंतराने विमा महामंडळाकडे जमा करावी लागते. विमा कराराच्या मुदतीत विमेधारकाचा मृत्यू झाल्यास विमेधारकाच्या कायदेशीर वारसांना विम्याची ठरलेली रक्कम मिळते. 

 

2)  प्रामृत विमा ( बंदोबस्ती विमा) – 

 

या योजनेअंतर्गत विमेधारकाला विमा हप्त्यांची रक्कम विमा कराराच्या मुदतीपर्यंत भरावी लागते. मुदतीपूर्वी जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर विम्याची रक्कम त्याच्या वारसदारांना मिळते व जर विमा कराराची मुदत संपल्यावर विमेधारक हयात असेल तर  ती विम्याची रक्कम व्याजासहित विमाधारकास मिळते.

 

3) लाभसहित व लाभविरहित विमा – 

 

 या योजनेअंतर्गत जर विमाधारकाने लाभसहित विमा पत्र घेतले असेल तर त्यास विमा महामंडळाच्या नफ्यातून काही भाग बोनसच्या कृपेने मिळतो, तर लाभ विरहित विमेधारकास बोनस मिळण्याचा अधिकार नसतो. 

 

4) सहजीवन विमा – coexistence insurance in marathi

 

 ह्या प्रकारात दोन व्यक्तींचा संयुक्तपणे विमा उतरविला जातो. ही योजना प्रामुख्याने पती- पत्नीसाठी आहे. या प्रकारात  पती- पत्नीचा संयुक्त विमा उतरविला जातो. या दोघांपैकी एकाच्या निधनानंतर दुसऱ्याला विम्याची रक्कम मिळते. 

   वरील विमा योजना व्यतिरिक्त वार्षिक वृद्धी विमा, अंतिम शेष जीवन विमा, मुला- मुलींच्या शिक्षणाचा विमा, विवाहाचा विमा, जीवन अक्षय विमा, इत्यादी आयुर्विमा महामंडळाच्या विविध विमा-योजना आहेत. या योजनांमध्ये सतत काळानुरूप व गरजेनुसार सुधारणा आणि वाढही होत आहे.

 

2] सामान्य विमा – General Insurance information in Marathi

   विमा व्यवसायातील हा दुसरा मुख्य प्रकार आहे. सामान्य विम्याचे पुढील तीन प्रमुख प्रकार आहेत:

  1. सागरी विमा
  2. अग्नि विमा
  3. अपघात विमा

     वरील तीन मुख्य प्रकाराशिवाय प्रामाणिकपणा विमा, बेकारीचा विमा, चोरी विरुद्ध विमा, स्वास्थ विमा असे अन्य प्रकार देखील आहेत. स्वातंत्र्यापूर्वी विमा व्यवसायास 1938 चा भारतीय विमा कायदा लागू होता. परंतु स्वातंत्र्यानंतर 1955 रोजी आयुर्वेदाच्या राष्ट्रीयकरण झाले. त्याचप्रमाणे सामान्य विमाचेही 1972 रोजी राष्ट्रीयकरण करण्यात आले.

      सामान्य विमा  व्यवसाय राष्ट्रीयकरण कायदा 1972 अनुसार सामान्य व्यवसाय करणाऱ्या देशभरात एकूण 107 कंपन्या अस्तित्वात होत्या. या सर्व कंपन्या एकत्रित करून त्यांची चार कार्यकारी कंपन्यात गटवारी करण्यात आली. या चार कंपन्या म्हणजे –

(1)नॅशनल इन्शुरन्स कंपनी म. प्रमुख कार्यालय, कोलकत्ता.

(2)न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी म. प्रमुख कार्यालय, मुंबई.

(3) ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी म. प्रमुख कार्यालय, नवी दिल्ली.

(4) युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मर्यादित, प्रमुख कार्यालय, चेन्नई. 

  

   या चारही कंपन्या जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ( भारतीय सामान्य विमा महामंडळ अथवा -GIC) या सूत्रधार कंपनीच्या सहाय्यक कंपन्या बनल्या. भारतीय सामान्य विमा महामंडळाची स्थापना १ जानेवारी, १९७३ रोजी करण्यात आली. 

 

  • सागरी विमा – marine insurance in marathi

या विमा योजनेंतर्गत सागरी प्रवासात जहाजे बुडून मालाचे तसेच जहाजाचे नुकसान झाले तर ते भरून देण्याची तरतूद आहे. यात व्यापाराचे भाडे उत्पन्न बुडले व त्यास धोका पोहोचतो. त्यामुळे जहाज वाहतूक कंपनीच्या दृष्टीने सागरी विमा हे एक वरदानच ठरलेले आहे. 

       जल वाहतुकीत जहाज खडकाला आपटून, शत्रूच्या हल्ल्यामुळे किंवा अन्य कारणांनी बुडण्याचा धोका असतो. अशा वेळेस जहाज वाहतूक कंपनीचे मोठे नुकसान होते. ह्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी सागरी विमा घेतला जातो. यासाठी सामान्य विमा कंपनीशी विशिष्ट रकमेचा व विशिष्ट मुदतीचा विमा करार केला जातो.

 

 विमा प्रमंडळाला विमेदाराकडून विमा हप्ता मिळतो. विमा हप्त्याच्या बदल्यात जर विमेधारकाचे विमा करारातील कारणामुळे नुकसान झाले तर विमा प्रमंडळातर्फे विमेधारकास नुकसान भरपाई रक्कम दिली जाते. या विमा योजनेमुळे जहाज वाहतूक कंपनीस मोठा आधार मिळालेला आहे.

 

2) अग्नि विमा – fire insurance in marathi

ह्या विमा योजनेअंतर्गत आगीमुळे होणारे नुकसान भरून देण्याची तरतूद आहे. कोणत्याही कारणाने दुकानात, कारखान्यात किंवा गोदामास आग लागली तर व्यापाराचे मोठे नुकसान होण्याचा धोका असतो. यासाठी अग्नि विमा उतरविल्यास व्यापाराला संरक्षण मिळते व करार मुदतीत व्यापाराची नुकसान झाले तर विमा प्रमंडळाकडून नुकसानीची रक्कम भरून मिळते. करार मुदतीत विमेधारकाचे काहीही नुकसान झाले नाही तर विमेधारकाने भरलेले विमा हप्ते त्यास परत मिळत नाहीत, तर ते विमा प्रमंडळाचे उत्पन्न बनते.

 

3)अपघात विमा – Accident Insurance In Marathi 

वाढत्या औद्योगीकीकरणामुळे तसेच वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपघातांची शक्यता ही वाढलेली आहे. अपघात विमा मुळे व्यक्तींची अपघाताने काही नुकसान झाले तर ते नुकसान विमा प्रमंडळाकडून भरून मिळते. अर्थात विमा प्रमंडळ फक्त करार मुदतीत जर अपघात झाला तरच नुकसान भरपाई देण्यास बांधील आहे. अपघात विमा करार एक वर्षाच्या मुदतीचा असतो. ह्या कराराचे दरवर्षी नूतनीकरण करता येते.

 

4) अन्य विमा – Others insurance in Marathi 

या विमा योजनेंतर्गत चोरांपासून होणारे  नुकसान, अप्रामाणिक नोकरामुळे होणारे नुकसान, कामगारांना द्यावी लागणारी नुकसान भरपाई, इत्यादी योजनांचा समावेश होतो.  याव्यतिरिक्त पिक विमा योजना, त्रयस्त व्यक्ती अपघात विमा योजना, वाहन विमा योजना, यंत्रसामग्री विमा योजना, इत्यादी विविध विमा योजनांचा समावेश सामान्य विमा या शीर्षकाखाली होतो. 

 

विमा कंपनी कायदा नुसार आवश्यक पुस्तके 

     विमा प्रमंडळात पुढील दोन प्रकारची पुस्तके ठेवावी लागतात : 

1)कायदेशीर पुस्तके ( नियामक पुस्तके)

2) दुय्यम पुस्तके 

 

1) कायदेशीर पुस्तके 

     विमा प्रमंडळाला विमा प्रमंडळ कायद्यानुसार पुढील कायदेशीर पुस्तके ठेवावी लागतात –

  • विमा पत्रांचे नोंदणी पुस्तक

             या पुस्तकात विमा प्रमंडळाने दिलेल्या प्रत्येक विमा पत्राची नोंद केलेली असते. विमेधारकाचे पूर्ण नाव, पत्ता, विमा पत्राची मुदत, रक्कम, विमापत्र करार संपण्याची तारीख, इत्यादी तपशील या पुस्तकात लिहिलेला असतो. 

 

  • दावा मागणी नोंदणी पुस्तक

             या पुस्तकात दावा मागणी करणाऱ्या विमेधारकाचे नाव, पत्ता, दावा रक्कम, दावा मागणी दिनांक, डावा रक्कम दिल्याचा दिनांक, जर दावा ना मंजूर केला असेल तर नामंजुरीचे कारणे व दिनांक, इत्यादी तपशील नोंदविलेला असतो. 

 

  • मान्यता प्राप्त विमा एजंट नोंदणी पुस्तक

             या पुस्तकात विविध विमा एजंटाची नावे, पत्ते, त्यांनी वर्षभरात केलेला व्यवसाय व त्यांना देय असलेली दलाली रक्कम ( कमिशन),इत्यादी तपशील लिहिलेला असतो. 

 

2)दुय्यम पुस्तके

     हिशेब व्यवस्थित ठेवण्यासाठी विमा प्रमंडळाच्या सोयीनुसार योग्य ती दुय्यम पुस्तके ठेवली जातात. यामध्ये प्रस्ताव नोंदणी पुस्तक, रोकड पुस्तक, किरकोळ रोकड पुस्तक, विमा हप्ता नूतनीकरण रोकड पुस्तक,सर्वसाधारण रोकड पुस्तक, दावा रक्कम रोकड पुस्तक, शाखा रोकड पुस्तक, विमा रद्द नोंदणी पुस्तक, विमा कर्ज नोंदणी पुस्तक, गुंतवणूक नोंदणी पुस्तक, इत्यादी पुस्तकांचा समावेश होतो. 

 

जीवन विमा म्हणजे काय?

“भविष्यकाळातील संभाव्य धोक्यांपासून संरक्षण मिळविण्यासाठी केलेल्या आर्थिक योजनेची तरतूद म्हणजे विमा होय”.

सागरी विमा म्हणजे काय?

सागरी विमा सागरी धोक्यांमुळे उद्भवणाऱ्या जोखमींचा विमा आहे. रेल्वे, रस्ता, समुद्र वा आकाश ह्या मार्गांनी वाहतूक होत असताना होणारी हानी ह्या विमाप्रकाराखाली संरक्षित होते.

विम्याचे फायदे काय आहेत?

हे तुम्हाला तुमचे नुकसान आणि नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य देते

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.

Leave a Comment